MKCL नॉलेज फाउंडेशन (एमकेसीएल के एफ) ही महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) ची १००% अनुदानित कंपनी असून कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अंतर्गत १४ सप्टेंबर २०१४ रोजी स्थापित केलेली एक ना नफा तत्वावरील संस्था आहे. संस्था क्रमांक: CIN U74900PN2014NPL152468.

सुप्त कौशल्ये व क्षमता अंगी असलेल्या अनेक व्यक्ती आपल्या समाजातील युवावर्गात आहेत. त्यामुळे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था म्हणून उदयास येण्याची आपल्या समाजामध्ये फार मोठी क्षमता आहे असा एमकेसीएलला विश्वास वाटतो. मात्र, या समूहाला योग्य दिशा देणे व प्रामुख्याने कृषिप्रधान वा उद्योगप्रधान अशा आपल्या अर्थव्यवस्थेचे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन करणे, हे आव्हानात्मक आहे.

संपूर्ण समाजामध्ये आजीवन शिक्षण संस्कृती रुजवून हे परिवर्तन घडवून आणता येऊ शकते. सर्वसामान्य जनतेला वाजवी मोबदल्यात, कोणत्याही वेळी व कोणत्याही ठिकाणी ही ज्ञान संसाधने उपलब्ध करून देता आली तरच इतक्या प्रचंड लोकसंख्येच्या विकसनशील समाजात आजीवन शिक्षण प्रक्रिया निरंतर चालू ठेवता येईल. भारतामध्ये तर केवळ माहिती तंत्रज्ञानाचा व्यापक आणि योग्य वापर करूनही आजीवन शिक्षण प्रक्रिया कायम चालू ठेवता येईल आणि नवे कार्याभिमुख ज्ञान संपूर्ण समाजाला उपलब्ध करून देता येईल.

जनसामान्यांना कार्यभिमुख ज्ञान व आवश्यक त्या सेवा उपलब्ध करून देणारा MKCL नॉलेज फाउंडेशन हा एक व्यावसायिक प्रकल्प आहे. आपल्या कामातून डिजिटल साक्षरता, ज्ञान व संधी यांमधील तफावत दूर करून सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचा MKCL नॉलेज फाउंडेशनचा प्रयत्न आहे.

MKCL नॉलेज फाउंडेशन (एमकेसीएल के एफ) ने परिवर्तनाची एक नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. यामधून शिक्षण, प्रशासन आणि सबलीकरण याच्याशी निगडित अशा उपाययोजना व सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या सेवांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

  • अनेक प्रकारचे वैविध्य असणार्‍या प्रचंड मोठ्या जनसमुदायाकरिता या सेवा आहेत : अधिक मोठ्या प्रमाणात
  • त्या जीवनात आणि कामाच्या ठिकाणी अत्यंत सुसंगत तसेच उपयुक्त आहेत : अधिक चांगल्या
  • या सेवा वाजवी मोबदल्यात मिळतात : स्वल्प दरात
  • या सेवा कमीत कमी वेळात मिळतात : अधिक जलद
  • त्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत सर्वत्र उपलब्ध आहेत : अधिक व्यापक
  • या सेवा जनसमुदायाकरिता असूनही वैयक्तिक पातळीवर वापरता येतील अशा आहेत : समृद्ध आणि व्यक्ती-अनुरूप अनुभव देणार्‍या

अशा प्रकारे साधारणपणे सर्वसामान्य जनतेचा विकास तसेच त्यांचे सबलीकरण याकरिता अतिशय महत्त्वाच्या अशा ज्ञानकेंद्रित समाजाच्या पायाभरणीस हातभार लावण्याचा MKCL नॉलेज फाउंडेशनचा प्रयत्न आहे.